Health Insurance Claim Rejection :आरोग्य विमा काढला की सर्व वैद्यकीय खर्चाची चिंता मिटली असेच सर्वांना वाटतं. मात्र, अनेकदा पॉलिसीमध्ये दडलेल्या काही नियमांमुळे तुमचा दावा नाकारला जाऊ शकतो. 'रीजनेबल अँड कस्टमरी क्लॉज' हा असाच एक महत्त्वाचा नियम आहे, ज्याकडे दुर्लक्ष केल्यास तुमचा क्लेम अडकू शकतो. रुग्णालयात दाखल होताच बहुतांश लोक आपला क्लेम सहज मंजूर होईल, असे मानतात. पण, हा 'रीजनेबल अँड कस्टमरी क्लॉज' अनेकदा उपचारांवर झालेल्या खर्चानंतरही तुमचा क्लेम नामंजूर करू शकतो.
काय आहे 'रीजनेबल अँड कस्टमरी क्लॉज'?
हा क्लॉज विमा कंपन्यांना हा अधिकार देतो की, फक्त त्याच खर्चांचे पेमेंट केले जाईल जे त्यांना 'उचित आणि सामान्य' वाटतील. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर विमा कंपनी तुमच्या उपचाराची किंमत आणि तुम्ही रुग्णालयात किती दिवस थांबलात यावर प्रश्नचिन्ह उभे करू शकते. जर त्यांना तुमच्या उपचारावरील खर्च बाजारातील सामान्य दरापेक्षा जास्त वाटला, तर ते अतिरिक्त रक्कम देण्यास नकार देऊ शकतात. यामुळे रुग्णाचा खर्च वाढू शकतो.
उपचाराच्या आवश्यकतेवर प्रश्न
उदाहरणार्थ एका व्यक्तीला 'गॅस्ट्रोएन्टेरायटिस'च्या उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले. उपचाराचे बिल २५,००० रुपये आले. परंतु, विमा कंपनी 'रीजनेबल अँड कस्टमरी क्लॉज' वापरून हा क्लेम नाकारू शकते. कारण, त्यांच्या मते अशा उपचारांसाठी रुग्णालयात दाखल होण्याची गरज नव्हती.
खर्चाच्या मूल्यावर प्रश्न
एका रुग्णाची कोरोनरी आर्टरी शस्त्रक्रिया झाली. या शस्त्रक्रियेचा सामान्य खर्च ५ लाख रुपये असतो, पण रुग्णाने १५ लाखांचा क्लेम केला. अशा वेळी विमा कंपनी 'उचित आणि सामान्य' खर्चाच्या नावाखाली अतिरिक्त १० लाख रुपये देण्यास नकार देऊ शकते.
क्लेम नामंजूर होण्यापासून कसे वाचावे?
- तुमचा आरोग्य विम्याचा क्लेम सहज पास व्हावा यासाठी तुम्ही खालील गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.
- रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी उपचाराच्या खर्चाची आणि आवश्यकतेची संपूर्ण माहिती विमा कंपनी किंवा त्यांच्या एजंटकडून कडून घ्या.
- उपचारापूर्वी रुग्णालयातील दर आणि प्रोटोकॉल समजून घ्या.
- मोठ्या शस्त्रक्रिया किंवा महागड्या उपचारांसाठी दुसऱ्या अनुभवी डॉक्टरांचे मत घ्या.
- डिस्चार्ज समरी आणि वैद्यकीय कारण स्पष्ट आणि अचूक असावे.
- शक्यतोवर विमा कंपनीच्या नेटवर्कमध्ये समाविष्ट असलेल्या रुग्णालयातच उपचार घ्या. यामुळे 'उचित' दरात उपचार होण्याची शक्यता वाढते.
वाचा - पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
म्हणून, तुमच्या मेडिक्लेम पॉलिसीतील हा 'रीजनेबल अँड कस्टमरी क्लॉज' नीट समजून घ्या, अन्यथा उपचारावरील खर्च तुमच्या खिशातून जाण्याची वेळ येऊ शकते.
